अहमदनगर- येथील पारनेर पंचायत समितीमध्ये सभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांवर भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी हा आरोप करत पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी पारनेर तालुक्यातील शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांगांना योजनांपासून वंचित ठेवणे, रोजगार हमी योजनेतील विहिरीसाठी तीस हजार रुपये कमिशन मागणे, शौचालय अनुदानात पैशाची मागणी करणे, वाढीव किंमतीच्या निविदा मंजूर करुन ठेकेदाराकडून टक्केवारी वसूल करणे, आदी आरोप यावेळी आझाद ठुबे यांनी केले. दरम्यान या आरोपांची चौकशी करुन सभापती आणि गट विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठुबे यांनी केली आहे.