अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे शेतात नांगरणीचे काम सुरु असताना अचानक तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श लागून शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. प्रवीण लक्ष्मण सुपेकर (२६) असे मृतक तरुणाचे नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील प्रवीण सुपेकर हा रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या भोईटे मळा या परिसरातील शेतात नांगरणीचे काम करत होता. दरम्यान, नांगरणी करताना अचानक शेतातून गेलेल्या विद्युत पोलवरील तार तुटून त्याच्या अंगावर पडली. विद्यूत प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यामुळे तो खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.