अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील मुळा उजवा कालव्याखालील भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या परिसरात पावसाने गेल्या अनेक दिवसांपासून ओढ दिल्याने खरिपाची पिके, जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून गेला आहेत. या गावातील बाजरी, तूर, मूग, कपाशी, सोयाबीन आदी पिके जळून गेली आहेत. या नुकसानीची पाहणी करून अशा पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भातकुडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांनी शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुळा उजव्या कालव्याच्या टेलच्या भागातील पोट चाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. या भागातील टेलपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याची कार्यवाही होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भातकुडगाव महसूल मंडळातील क्रिटिकल झोन उठवण्याबाबत ही मागणी यावेळी करण्यात आली, क्रिटिकल झोनमुळे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विहिरींचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही, त्यामुळे क्रिटिकल झोन ताबडतोब रद्द करावा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवितांना दोन विहिरी मधील अंतर ५०० फुटाची अट शिथिल करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी बचाव जनआंदोलन कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक जाधव, बाबा जाधव, मन्सूर भाई पटेल, बाळासाहेब काळे, सर्जेराव आहेर, अनिल सरोदे, सोमनाथ मोहिते, मुरलीधर दुकळे, काळे बाळासाहेब, विठ्ठल आढाव, अनिल दुकळे, राजेंद्र दुकळे, अशोक दुकळे, बाबूलाल पटेल आदी शेतकरी उपस्थित होते.