शिर्डी : बुगडी माझी सांडलीग ही लावणी एका भिक मागणाऱ्या महिलेने म्हटल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाला आहे. मात्र ही महिला कोण व कुठली याचा उलघडा होत नव्हता. परंतु या व्हिडिओतील तिचा आवाज आणि अदाकारी बघून ही कोणीतरी मुरब्बी कलाकार आसावी, असे जाणवत होते. मग जाणकारांनी शोध सुरु केला त्या महिलेचा तेव्हा धक्कादायक माहिती हाती लागली. ती भिक मागणारी महिला चक्क एकेकाळी लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर टाळ्या आणि शिट्यांनी गाजवत होती. तिच्या अदाकारी अन् सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केले होतं. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगांवकर उर्फ शांताबाई अर्जुन लोंढे असल्याचं समोर आल. मात्र ती आता कोपरगावच्या रस्त्यावर भिक्षा मागताना दिसत असल्यानं अनेकांचं हृदय पिळवटून निघालं आहे.
दिवसभर भिक मागून कोपरगावच्या डेपोत मुक्काम : शांताबाई कोपरगांवकर उर्फ शांताबाई अर्जुन लोंढे या एकेकाळच्या लावणी सम्राज्ञी होत्या. त्यांच्या अदाकारी अन् सौंदर्यानं अनेक रसिक घायाळ होत होते. महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी पैकी एक दिग्गज म्हणून शांताबाई कोपरगांवकर उर्फ शांताबाई अर्जुन लोंढे यांचं नाव घेतलं जात होतं. चाळीस वर्षापूर्वी मुंबईच्या लालबाग परळ हनुमान थिएटर येथे वन्स मोर, टाळ्या, शिट्ट्या शांताबाईसाठी वाजत होत्या. परंतु आज त्यांच्यावर भिक मागून कोपरगावच्या बस स्थानकात राहण्याची वेळ आली आहे. कोपरगावचं बसस्थानक हेच त्यांच घर असून पोट भरण्यासाठी त्या दिवसभर भिक मागत फिरताना दिसत आहेत. कुणाला ती वेडी वाटते, तर कुणी तिला दगड मारते. अंगावर एकच मळलेली साडी अन् ब्लाऊज तसेच हातात एक गाठोड घेऊन शांताबाई रस्त्यावर फिरतात.
असा लागला शांताबाईचा शोध : गेल्या काही दिवसापासून सोशल माध्यमातून एका वयोवृद्ध महिलेचा एक लावणी गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ तमाशा क्षेत्रातील विठा भाऊ मांग यांचे नातू मोहित नारायणगावकर यांच्या तमाशा कलावंताच्या ग्रूपवर आला. त्यावेळी त्यांची ओळख शेषराव गोपाल यांना झाली. व्हिडिओतील दिसणारी ती वयवृद्ध महिला अतिशय प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खान्देश भागात शांताबाई यांचा विशेष वावर राहिला आहे. ही माहिती मिळताच कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता डॉ. अशोक गावित्रे यांनी तिचा कोपरगाव येथे शोध सुरु केला. त्यानंतर त्यांना दोन दिवसांनी ती वृद्ध महिला कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौकात आढळून आली. त्यानंतर तिला गाडीत बसवून शांताबाईचे भाचे धोंडीराम लोंढे यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून नवीन वस्त्रे परिधान करण्यास दिले. त्यानंतर चहा नाश्ता देवून त्यांच्यासोबत चर्चा करून शिर्डी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आला.
डोळ्यात अनावर अश्रू, हुदंका देत सांगितली आपबिती : शांताबाईला तीन भाऊ होते, मात्र ते हयात नाहीत. तर शांताबाईंनी लग्न न केल्यामुळे त्यांना मूल नाहीत. शिक्षण न झाल्यामुळे त्यांना लिहिता, वाचता येत नाही. याचाच गैरफायदा घेऊन त्यांच्या नावाचा तमाशा फड फसवणूक करुन तो दुसऱ्याला विकल्याने शांताबाई रस्त्यावर आल्या. जवळच्या माणसाने दगा दिल्यामुळे शांताबाईच्या मनावर खूप मोठा आघात झाला. हे सर्व सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते. हुदंका देत त्या सर्व सांगत होत्या, परंतु येवढा मोठा अघात होऊन देखील त्यांची कला जीवंत आहे. अशा उमद्या कलाकारास राहण्यासाठी स्वतःचं घर नाही. शासनाचे टुटपुंजे मानधन ते पण तीन चार महिन्यातून एकदा जमा होते. आज शांताबाईचं शरीर जीर्ण झालं आहे, वय सत्तर वर्षाच्या पुढं आहे. इतकी माहिती घेतल्यानंतर शांताबाईंनी गवळनी म्हणून दाखवल्या. त्यांचा पहाडी आवाज व लकब, चेहरा व डोळ्यांतील हावभाव बघून उपस्थित भारावून गेले.
हेही वाचा -