अहमदनगर - शिर्डीच्या साईबाबा संस्थानमार्फत चालविल्या जाणाऱ्या साईबाबा आणि साईनाथ रूग्णालय गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरलेली असताना सन २०१५ पासून आजवर पाच वर्षातील औषध खरेदी व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी औषध खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. या संबधीत यंत्रणेत अधिकारी, औषध कंपन्या, पुरवठादार आणि हितसंबध असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, ठरावीक एजन्सीच्याच माध्यमातून औषध खरेदी करणे, एल-वन ऐवजी एल-२ कडून वारंवार औषधांची खरेदी का केली? प्रत्येक वर्षी औषध खरेदीसाठी ५५ कोटी रकमेची तरतुद केली असताना प्रत्यक्षात २५-३० टक्केच औषध खरेदी होत असल्याने अखर्चीत रकमेवर भराव्या लागणाऱ्या आयकराची जबाबदारी कोणाची या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरलेली रुग्णालये -
साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर साईबाबा संस्थान प्रशासनाला शिस्त लावण्याबरोबरच संस्थान कारभाराला गती देण्यात मोठे आव्हाण बगाटे यांच्यासमोर होते. साईबाबा संस्थानची साईनाथ आणि साईबाबा सुपर स्पेशालीटी हे दोन्ही रूग्णालय राज्यातील गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. कोरोनाच्या संकटात सुमारे सात हजारांच्यावर रुग्णांना मोफत उपचार करून जीवनदान या रूग्णालयांच्या माध्यमातून साईबाबांचा दवा आणि दुवा याचा प्रत्यय रूग्णांना आला आहे.
कर्तव्यात कसूर कराल तर कारवाईचा इशारा
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी साई संस्थानच्या दोन्ही रुग्णालयावर लक्ष केंद्रित केले असून रिक्त असलेल्या जागांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या व परिचारीकांच्या नेमनुका करत दोन्ही रुग्णालयांची आरोग्य सेवा गतिमान करण्याबरोबरच या रूग्णालयातून रूग्णांना चांगल्या सुविधा व सेवा देण्याबाबत रूग्णालय यंत्रणेला भाग पाडले आहे. कर्तव्यात कसूर कराल तर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी प्रशासनाला दिल्याने रूग्णालय प्रशासन एका झटक्यात वठणीवर आले आहे.
औषध खरेदी प्रकरणाची जोरदार चर्चा
संस्थानच्या रूग्णालयातील औषध खरेदी प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. या प्रकणातील लाभार्थी कोण आहेत? एल १ पुरवठादाराला ऑर्डर दिल्यानंतर तो औषधांची पुरवठा का करत नाही. एल १ आणि एल २ चे काही साटेलोटे आहे का ? महागड्या दराने औषधे खरेदी करण्यामागे कोण अधिकारी आहेत का याचा सोक्षमोक्ष चौकशीत अंती होणार आहे.
काय आहे औषध खरेदी प्रकरण?
साईनाथ व साईबाबा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची औषध खरेदी करताना लुट होवू नये यासाठी साईबाबा संस्थानकडून दरवर्षी सुमारे ५५ ते ६० कोटी रूपयांची औषधे खरेदी करण्यास रूग्णालय खरेदी विभागात परवानगी दिली असताना सन २०१५-१६ साली फक्त १९.६८ कोटींची खरेदी झाली. तर २०१६-१७ साली १६.३६ कोटी, २०१७-१८ साली १८.३२ कोटी,२०१८-१९ साली २१.७५ कोटी ,२०१९-२० साली २१.१५ कोटीची प्रत्यक्षात खरेदी झालेली आहे.
प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी
साईबाबा संस्थानकडून औषध खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुद असतानाही औषधे खरेदी का करण्यात आली नाही, पाच वर्षात ठरावीक एजन्सी यांनाच औषध खरेदीच्या ऑर्डर कशा देण्यात आल्यात? एल-१ ऐवजी एल-२ कडून औषध खरेदी करताना ठरावीक एजन्सीकडूनच औषधे खरेदी का करण्यात आली ? एल-१ आणि एल-२ यांच्यात संगणमत होते का ? पाच वर्षात एल-१ आणि एल २ त्याच असल्याने या प्रकरणात संशय अधिक वाढला आहे. पाच वर्षात २७० कोटी रूपयांची औषधे खरेदी करण्यास तरतुद असताना फक्त ९७.३७ कोटीचीच खरेदी करण्यामागे खासगी वैद्यकीय व्यावसायीकांशी कोणाचे आर्थिक हितसंबध आहेत. याची सखोल चौकशी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सुरू केलेली आहे.
औषध खरेदी अखर्चीत रकमेमुळे संस्थानला आयकराचा मोठा भुर्दंड
साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने दरवर्षी ५५ ते ६० कोटी रुपयांची तरतुद औषध खरेदीसाठी केलेली असताना त्यातील फक्त २० ते ३० टक्के रकमेचीच औषधे खरेदी झाले. त्यामुळे रूग्णांना मोठा आर्थिक भार सोसावा लागला पण पाच वर्षात २७० कोटींची तरतुद असताना फक्त ९७.३७ कोटींचीच औषध खरेदी झाले यातील अखर्चीत रकमेमुळे आयकराचा मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
'प्रकणातील दोषींवर कडक कारवाई होईल'
साईबाबा संस्थान व्यवस्थापनाकडून संस्थान रूग्णालयांना औषध खरेदीसाठी आर्थिक तरतुद केलेली असतानाही प्रत्यक्षात खरेदी झालेली नाही. याची सखोल चौकशी करून या प्रकणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांना कदापीही पाठीशी घातले जाणार नसल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे म्हणाले आहे.
हेही वाचा - ७०० कोटींचा घोटाळा, ईडीचा अजित पवारांना दणका, साताऱ्यातील साखर कारखाना जप्त