अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांना भाविक वेगवेगळ्या स्वरूपात दान करत असतात. अनेक भाविक पैसे, सोने, चांदी, माणिक, मोतीही दान करतात तर शेतकरी आपल्या शेतातील निघालेले पाहिले पिकही दान करतात. याचप्रमाणे देशातील वाहन क्षेत्रात अग्रगण्य असलेला महिंद्रा अँण्ड महिंद्रा ग्रुप त्यांच्याकडे उत्पादित होणारी नवीन पहिली गाडीही साई चरणी दान करत असतात. आजही साईबाबा संस्थानला या ग्रुपच्या वतीने पंधरावी कार दान स्वरूपात दिली गेली आहे.
महिंद्रा ग्रुपचा दिलदारपणा : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा चरणी भाविक कोट्यवधीचं दान देतात. याच बरोबरीने अनेक भाविक साई संस्थानच्या रुग्णालयात, प्रसादालयात, निवास व्यवस्था या ठिकाणी उपयोगी येईल अशाही वस्तू दान स्वरूपात देत असतात. यात देशातील वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असलेला महिंद्रा ग्रुप कडून उत्पादित होणारी पहिली चारचाकी असो किंवा दुचाकी एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरही दान स्वरूपात साईबाबा संस्थानला देण्यात आले आहे.
साई चरणी स्वयंचलित कार दान : साईबाबा संस्थानच्या इतिहासात आता पर्यंत महिंद्रा ग्रुपने 14 वाहने दान स्वरूपात दिली आहेत. आज महिंद्रा कंपनीची एसयुव्ही 700 या मॉडेल मधील एटोमॅटीक मॉडल कार दान स्वरूपात दिली आहे. या गाडीची ऑनरोड किंमत 27 लाखाच्या जवळपास असल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे. आज साईबाबांच्या मध्यान्न आरतीनंतर महिंद्रा कंपनीचे मुख्य व्यवस्थापक नागराज यांच्या हस्ते सपत्नीक या गाडीची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर गाडीच्या चाव्या साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
दिवाळीत साईचरणी अठरा कोटींचे दान : साई दर्शनासाठी दरवर्षी अडीच कोटीहून अधिक भाविक साईदरबारी हजेरी लावतात. दिवाळी व सुट्टयांमध्ये विक्रमी गर्दी असते. वर्ष 2022च्या दिवाळीत २० ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या 15 दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पंधरा दिवसात भाविकांनी १७ कोटी ७७ लाख ५३ हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
हेही वाचा: