अहमदनगर - युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील हे आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी सकाळी ११ वाजतापासून युतीने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली आहे. या रॅलीत पालकमंत्री राम शिंदे आणि पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची उपस्थित आहेत.
रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी डॉ. सुजय विखे यांनी ग्रामदैवत गणपतीची आरती करुन दर्शन घेतले. त्यानंतर ते रॅल्लीत सहभागी झाले. रॅलीदरम्यान महादेव जानकर आणि राम शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधून प्रचाराच्या नीतीबद्दल माहिती दिली. यावेळी दोघांनाही बोलताना उमेदवार डॉ. सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. राम शिंदे यांनी, आता पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती या मतदारसंघात होणार नाही. यावेळी शरद पवार यांचा उमेदवार निश्चित पराभूत होणार असून युतीचे उमेदवार सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
महादेव जानकर यांनी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची जागा राज्यात दिली नसली, तरी आम्ही देशभरात ११० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राज्यात उमेदवार नसला, तरी मी नाराज नाही, विधानसभा निवडणुकीत आम्हाला समाधानकारक जागा मिळतील, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातही आपण प्रचार करणार असल्याची माहिती जानकर यांनी यावेळी बोलताना दिली.