शेवगाव (अहमदनगर) - हमाली काम करत असताना झालेल्या दुखापतीमुळे आपले दोन्ही पाय निकामी झालेल्या गंगा उर्फ गंगाराम पवार गावभर मागील पंचवीस वर्षांपासून फरफटत हाताच्या पंजावर भिक्षा मागून आपल्या छोट्याशा झोपडीत जीवन जगत होते.
ही बाब सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे चांद शेख यांना समजल्यानंतर त्यांनी शेवगावमध्ये समाजकार्यात सक्रिय असलेल्या न्यू आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या १९९६ बॅचच्या माजी विद्यार्थी ग्रुपशी संपर्क करून दिव्यांग गंगारामला मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर दिपावलीच्या पूर्व संध्येलाच ताबडतोब मदत देण्याचे जाहीर करून दिव्यांग गंगारामला तीनचाकी सायकल, तसेच सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे माध्यमातून पोषाख व मिठाई देत अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. गंगारामला सायकल मिळालेच्या आनंदाने त्याच्या डोळ्यातील अश्रु वाहल्याचे पाहुन उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
समाजातील दानशूर व्यक्तींनी सामाजीक दातृत्व दाखवावे
समाजातील दानशूर व्यक्तींनी खरी गरज असलेल्या दिव्यांगांना मदत करून आपले सामाजीक दातृत्व दाखवाले आणि भविष्यात देखील दाखवावे, असे मत चांद शेख यांनी व्यक्त केले.
नातेवाईक, मित्र परिवारांची दिवाळी गोड करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. परंतु एखाद्या वंचितांची दिवाळी गोड करणारे मोजकेच असतात. पंचवीस वर्षाचा वनवास संपला आहे, असे बाबासाहेब महापुरे यांनी सांगितले.