अहमदनगर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व किसान यांचे संयुक्त विद्यमाने 7 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत झुम अॅपवर शेतकरी शास्त्रज्ञ पंधरवडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विभागातील गुणनियंत्रण अधिकारी सुनिल बोरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी निम्नस्तर कृषी शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे, विभागीय विस्तार केंद्रातील डॉ. सोमनाथ माने, डॉ. रविंद्र कारंडे व डॉ. सुनिल जोगदंड यावेळी ऑनलाईन उपस्थित होते.
या पंधरवडा कार्यक्रमात सहाव्या दिवशी डॉ. सुनिल जोगदंड यांनी आंबा लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आंब्यामध्ये नियमीत व लवकर मोहोर येण्यासाठी पॅक्लोब्युड्राझोलचा वापर कसा करावा तसेच येणाऱया काळात आंबा मोहोराचे संरक्षण विद्यापीठाच्या शिफारशीनुसार केल्यास आंबा पिकापासून शेतकरी निश्चितच भरघोस उत्पन्न घेऊ शकतात. तसेच या कार्यक्रमाच्या आठव्या दिवशी पेरु मृग बहार व्यवस्थापन या विषयी त्यांनी सांगितले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पेरु सघन लागवडीसाठी केलेल्या शिफारशी व छाटणी तंत्र पेरु उत्पादकांसाठी फायद्याचे आहे.
ऑनलाइन 'शेतकरी शास्त्रज्ञ पंधरवडा' कार्यक्रम
या पंधरवड्यात डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. आनंद सोळंके, डॉ. विनय सुपे, डॉ. सुभाष भालेकर, डॉ. दिपक दुधाडे, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. विष्णु नरवडे, डॉ. सुनिल कराड, डॉ. सुनिल लोहाटे, डॉ. संतोष मरबळ, डॉ. संतोष मोरे, डॉ. रविंद्र कारंडे व डॉ. सोमनाथ माने यांनी वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन उपस्थित शेतकऱयांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात वेगवेगळ्या तज्ज्ञांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, पुणे डॉ. सुनिल मासाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.