अहमदनगर - शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याचं प्रकरण ज्या महिलेमुळे ऐरणीवर आलं, अखेर ती व्यक्ती साडेतीन वर्षांनंतर सापडली आहे. मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील दिप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच फटकारलही होतं. तसेच मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना दिले होते. अखेर दिप्ती सोनी सापडल्या आहेत.
मध्यप्रदेशातील इंदौरच्या दिप्ती सोनी 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दिप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 38 वर्षीय दिप्ती सोनी पती मनोज सोनी (वय 42 वर्ष) आणि मुलांसह 2017 मध्ये इंदौरहून शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यानंतर त्या बेपत्ता झाल्या. दिप्ती सोनी गुरुवारी (17 डिसेंबर) संध्याकाळी इंदौरमधील बहिणीच्या घरी परतल्या, अशी माहिती मनोज सोनी यांचे वकील सुशांत दीक्षित यांनी दिली.

दिप्ती सोनी सापडल्याची माहिती कोर्टाला देण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (18 डिसेंबर) सोनी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली. कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती सोनी कुटुंबासह 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथून त्या बेपत्ता झाल्या. अखेर तीन वर्ष चार महिन्यांनी त्या गुरुवारी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी इंदौरमधील बहिणीच्या घरी सुखरुप परतल्या. मनोज सोनी यांच्या सासऱ्यांनी त्यांना फोन करून दिप्ती बहिणीच्या घरी परत आल्याचं कळवलं. दिप्ती तीन वर्षांपासून इंदौरमध्येच राहत होत्या आणि मनोज यांच्या सासऱ्यांना त्या सापडल्या.
'मला सासऱ्यांचा फोन आला'
मी बडोद्यात ड्युटीवर असताना सासऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी दिप्ती गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बहिणीच्या घरी परत आल्याचे सांगितले. मी तिथून लगेच इंदौरला आलो आणि रात्री सव्वाबारा वाजता तिला भेटलो. ती मागील साडेतीन वर्षे नेमकी कोणत्या ठिकाणी होती, याबाबत तिने स्पष्ट सांगितलं नाही. ती म्हणाली की, शिर्डीच्या साई मंदिराबाहेरच्या दुकानात गेल्यानंतर ती चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिला पुढचं काहीच आठवत नाही. ती परत आली हाच आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. मागील साडेतीन वर्षे आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होती. तर दीप्ती सोनी यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, "त्या एका वृद्ध महिलेसह इंदौरमध्येच राहत होत्या. पण शिर्डीतून इंदौरमध्ये कशा परत आल्या हे त्यांना सांगता आलं नाही, असं मनोज सोनी यांनी सांगितलं.
औरंगाबाद खंडपीठाचे पोलीस तपासावर ताशेरे
दिप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ता झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारलं होतं. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी पोलिसांनी दाखल केलेला संपूर्ण तपासाचा 200 पानी अहवाल निरर्थक ठरवला. कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही, असं न्यायालयाने म्हटलं. मात्र मानवी तस्करीबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे. असं उत्तर यावर पोलिसांनी दिलं.
शिर्डीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची आकडेवारी
वर्ष | बेपत्ता | तपास |
2017 | 71 | 20 |
2018 | 82 | 13 |
2019 | 88 | 14 |
2020 | 38 | 20 |