अहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या कमी पडणाऱ्या खाटा व रेमडेसिवीर यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कडक निर्बंध असताना नगर जिल्ह्यातील हाताबाहेर चाललेली परस्थिती पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी (दि. 17 एप्रिल) घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यात चौदा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून (दि. 18 एप्रिल) त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. नागरिकांना अत्यावश्यक म्हणून किराणा, मटण, चिकन ही दुकाने आणि घरपोहोच भाजीपाला वितरणासाठी सकाळी सात ते अकरा अशी केवळ चार तासांची मुदत देण्यात आली. भाजीबाजारात एकाच ठिकाणी शेकडो लोक एकत्र येतात म्हणून वितरणाचे आदेश आहेत. मात्र, असे असले तरी नगर शहरातील बहुतांश भाजी बाजार हे जनता कर्फ्युत नियमितपणे भरत असताना या ठिकाणी कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवली जात आहेत. मात्र, याकडे ना पालिकेचे लक्ष ना पोलिसांची कारवाई होत आहे.
आयुक्तांनी सोमवारी दिला होता कारवाईचा इशारा
भाजीबाजार हे नियमित भरत असल्याने काल (सोमवारी) महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी भाजीबाजार भरवल्यास विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. तसे आदेश काढून महापालिका भरारी पथकांना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, आयुक्तांचा इशारा व कारवाईच्या आदेशाला ना भाजीपाला विक्रेत्यांनी जुमानले ना भरारी पथकाने गांभीर्याने घेतले असेच म्हणावे लागेल. आज (दि. 20 एप्रिल) सकाळी सात नंतरच भाजीबाजार नियमित भरले आणि या ठिकाणी शेकडोच्या संख्येने नागरिक खरेदीसाठी जमले. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत अनेकजण मास्क न वापरता दिसून आले.
जनता कर्फ्यू तरीही कोरोनाग्रस्तांची वाढ
एकीकडे माध्यमातून कोरोना मुळे झालेली भीषणता पाहून नागरिक भयभीत आहेत. अनेकांच्या घरात किंवा नात्यातील रुग्ण बाधित आहेत. लोक सॅनिटरायजेशन स्प्रे, मास्क विकत घेत आहेत. पण, त्याचा वापर किती गांभीर्याने केला जातो हा प्रश्न आहे. कोरोनात अनेक तज्ज्ञांनी कोरोनापासून बचावासाठी एक तर घरात सुरक्षित थांबा किंवा बाहेर पडणे गरजेचे असेलच दोन व्यक्तीत सहा फुटांचे अंतर ठेवा असे बजावून सांगत आहेत. तरीही लोकांकडून सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडविला जात आहे. परिणामी जनता कर्फ्यू लागू करूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.
हेही वाचा - महिला रूग्णासह चोरून नेली रूग्णवाहिका!