अहमदनगर- जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार असल्याची विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर, तनपुरे हे उद्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे देखील समजले आहे.
प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 25 वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर त्यांची आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी मिळवली आहे. तर, अमेरिकेमधून त्यांनी एम.ई ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. प्राजक्त हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे देखील आहेत.
आतापर्यंत राहुरी विधानसभेला कोणतेही मंत्रीपद नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे अकोले येथील आमदार किरण लहामटे यांच्यासाठी आग्रही होते. परंतु, अजित पवार व जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे, रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्राजक्त तनपुरे यांचे नाव राज्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचे समजते.
हेही वाचा- बालमटाकळीत एकाच रात्रीत चार घरफोड्या; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास