अहमदनगर - कोरोना रूग्ण संख्येच्याबाबतीत नगर जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर आहे. कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून याला नागरिकांचा बेफिकीरपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काल (शुक्रवारी) एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे 1 हजार 800 नविन रूग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. जे नागरिक आणि व्यावसायिक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः मैदानात उतरत कारवाई सुरू केली आहे.
शुक्रवारी एकाच दिवशी आढळले 1 हजार 800 नविन रूग्ण -
सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी, दिवसभर बाजारातील गर्दी तर, रात्री रेस्टॉरंट-बारमधील गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाची भीती आणि गांभीर्य दोन्ही नाही, असे दिसते. काल(शुक्रवारी) एकाच दिवशी १ हजार ८०० नविन रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची नगर जिल्ह्यातील ही उच्चांकी वाढ आहे. आज (शनिवारी) सकाळचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि भाजीपाला मार्केटमधील गर्दी पाहता वाढती रूग्ण संख्या कमी कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गर्दीवरवर ना बाजार समितीचे नियंत्रण आहे ना पोलीस आणि महानगरपालिकेचा वचक. त्यामुळे कोरोना आणखी पसरण्याची भीती वाढली आहे.
पोलीस अॅक्शन मोडमध्ये -
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. सामान्य दुकानांना सायंकाळी सात वाजेपर्यंत तर हॉटेल्स-बार यांना आठ वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. तरी निर्ढावलेले हॉटेल चालक आणि बेजबाबदार नागरिक रात्री आठ नंतरही नियम मोडत आहेत. त्यामुळे आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नियम मोडणारे दुकानदार, हॉटेल आणि बारवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः मैदानात उतरत ही कारवाई सुरू केली आहे. मात्र, ,संबंधित हद्दीतील स्थानिक पोलीस काय करतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
२ एप्रिलपर्यंतची कोरोनास्थिती -
- नवीन रूग्णसंख्या - १ हजार ८००
- रूग्णालयातून सुट्टी मिळालेली रूग्णसंख्या - ६४५
- कोरोनातून बरी झालेली एकूण रूग्णसंख्या - ८८ हजार ४७३
- उपचार सुरू असलेले रूग्ण - ८ हजार ३३५
- कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू - १ हजार २३३
- जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णसंख्या -९८ हजार ४१