हिवरे बाजार (अहमदनगर) - संपूर्ण जगालाच कोरोनासोबत जगावे लागणार आहे, अशात देशात किंवा राज्यात लॉकडाऊन करून चालणार नाही. तसेच कोरोनामुक्त असलेल्या गावात शाळा सुरू झाल्या पाहिजे, असे मत राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. अशा आशयाचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले असून त्यात हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू केल्याचे संदर्भ देखील दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक गाव कोरोनाबाधित झाले. अनेकांचे जीव गेले. या काळात हिवरे बाजारलाही कोरोनाने वेढले. मात्र पोपटराव पवार यांनी गावातच कोरोनामुक्तीची स्पर्धा घेतली आणि त्याला यश येत 15 जुलै ते 30 जुलै दरम्यान संपूर्ण हिवरे बाजार कोरोनामुक्त झाले. या मागे हिवरे बाजारमध्ये गेली 25 वर्षांची शिस्त असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. शेती, शिक्षण आणि आरोग्य यावर हिवरे बाजारने गेली पंचवीस-तीस वर्षे काम केले आहे. यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असल्याने कोरोनाचा गावात शिरकाव होताच, ज्या ज्या उपाययोजना केल्या त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
'राज्यातील कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करा'
कोरोना काळात सर्वाधिक नुकसान शेती-शेतकरी आणि शिक्षणाचे झाल्याचे मत पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे. शहरी भागात मोबाइल नेटवर्क चांगले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीला शहरात अडचण येत नाही. मात्र ग्रामीण भागात मुळात स्मार्टफोन बाबत जास्त वापर नसतो. त्यात मोबाइल नेटवर्कची मोठी अडचण अनेक गावात आहे. स्मार्टफोनच्या वापराची माहिती, आर्थिक दुर्बलतेमुळे स्मार्टफोन विकत घेणे, या अडचणी ग्रामीण भागात आहेत. एकूणच ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या अडचणींमुळे ऑनलाइन शिक्षणात अडचणी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे शहरी भागातील विद्यार्थी किमान ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण प्रवाहात टिकून असताना ग्रामीण भागातील विविध अडचणीमुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे सरकारने किमान जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा ठिकाणी कोरोनाचे नियम लादत शाळा सुरू केल्या पाहिजे, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रातून केली आहे.
'शेतीचे वाढीव उत्पन्न पंजाबमध्ये ठरले घातक'
हिवरे बाजारचे दरडोई उत्पन्न हे आशियाखंडात सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. मात्र शेतीतून वाढलेले उत्पन्न हे सकारात्मक न वापरता अनुचित वापरले, तर गावाचा कसा नाश होतो, याचे पंजाब राज्य हे उदाहरण असल्याचे पवार यांनी सांगितले. हिवरे बाजारमध्ये शेती, दूध आणि शिक्षण या तीन गोष्टीत नियोजनबद्ध कार्यक्रम अनेक वर्षे राबवल्याने आज उत्तम शेती, आर्थिक फायद्याला दूध व्यवसायाची जोड, शिक्षणातून नोकऱ्या-व्यवसाय यामुळे आज गावातील प्रत्येक कुटुंबाचे किमान उत्पन्न एक लाखावर आहे. मात्र पाचशे ते आठशे पटीने कुटुंबाचे उत्पन्न वाढले असले तरी गावाने सात सूत्री कार्यक्रम तीस वर्षांपासून पाळल्याने गाव आजही शेती, शिक्षण आणि आरोग्याबाबत जागरूक आहे. या उलट पंजाबमध्ये पाहिले तर शेतीतून आलेला पैसा व्यसनाधिनतेकडे घेऊन गेल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
'किचन फॉर हेल्थ नॉट टेस्ट'
आज लोकांना चमचमीत खाणे आवडते. त्यामुळे अनेकांचे किचन हे किचन फोर टेस्ट झाले आहे. याउलट हिवरे बाजारने आरोग्याची काळजी घेत प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून 'किचन फॉर हेल्थ' हा उपक्रम घराघरात राबवला जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून आम्ही गाव केवळ पंधरा दिवसांत कोरोनामुक्त केले असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -पिकनिकला जाताय, सावधान!!! राज्यात सापडले अतिघातक कोरोना डेल्टा प्लसचे २१ रुग्ण