अहमदनगर - कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी अथक आणि अहोरात्र सेवा बजावणार्या बूथ रुग्णालयातील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनी सत्कार करण्यात आला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना यामधील महत्वाचा दूवा असणार्या परिचारिकांप्रति यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शहरातील इव्हेंजलीन बूथ रुग्णालय येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील परिचारिका आणि डॉक्टर्स यांच्यासोबत इतर आरोग्य कर्मचारी अतिशय सेवाभावी वृत्तीने कर्तव्य बजावत आहेत. मंगळवारी जागतिक परिचारिका दिनानिमित्त या परिचारिकांच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आले. रुग्णालयाचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या सेवेची आठवण करत सर्व परिचारिकांचे कौतुक केले व त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे आभारही मानले. सर्व परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
परिचारिका ही आरोग्य सेवेतील अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. परिचारिका केवळ रुग्णांची सेवा करत नाही, तर आधारही देत असते. बूथ रुग्णालय हे अहमदनगर शहरातील अतिशय जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयाने नर्सिंग प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू केले. ८० वर्षांचा नर्सिंग सेवेचा इतिहास असणाऱ्या बूथ रुग्णालयाच्या परिचारिकांचा सर्वांनाच खूप अभिमान आहे. येथील नर्सिग सेवेने प्रेरित होऊन अनेकांनी नर्सिंग सेवेची निवड केली. आजही रुग्ण डिस्चार्ज होऊन जातांना परिचारिकांचे त्यांच्या सेवेबद्दल आभार मानतात व त्यांचे कौतुक करतात, असे मेजर कळकुंबे म्हणाले.
सिस्टर सरला संसारे, सिस्टर सत्वशिला वाघमारे, सिस्टर मनिषा, सिस्टर शितल आणि विजय कसबे यांनी त्यांचे परिचारिका सेवेतील अनुभव सांगितले. ते सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे अनुभव ऐकल्यावर त्यांच्याविषयी मनातील आदर अधिकच वाढला. स्वतःचा जीव धोक्यात घालून, परिवाराची चिंता न करता अहोरात्र त्या रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्या या त्यागाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात केली.