अहमदनगर - शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून उपचारासाठी आलेल्या गंभीर रुग्णांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मृतांचा आकडा वाढला आहे. या सर्वांवर अहमदनगर शहरातील अमरधाम स्मशानभूमीत या एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होत असल्याने वायू प्रदूषणामुळे अंत्यसंस्कार करण्यास शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विरोध केला होता. त्यांच्या या विरोधामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यातील मृत झालेले जवळपास 24 शव ही शवागृहात पडून होती आणि त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांत मोठा असंतोष होता. अखेर आमदार जगताप यांची मागणी, नातेवाईकांचा संताप आणि केंद्राच्या प्रोटोकॉलचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शहरातील उपनगर असलेल्या केडगाव, नवंनागापूर येथील स्मशानभूमीत शहराबाहेरील मृतांवर अंत्यसंस्कार होतील, असा निर्णय घेतल्याने अखेर गेले तीन दिवस शवागृहात ठेवण्यात आलेल्या 24 शवावर केडगाव येथील स्मशानभूमीत रविवारी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आले.
मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी फरफट -
आधी त्यांना कोरोनाने गाठले, मग रुग्णालयात बेड, ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटरसाठी झगडावे लागले. मात्र, तरी आयुष्याची दोरी तुटली आणि त्यात मृत्यू झाला. ही फरफट इथेच थांबली नाही. मृत्यू झालेल्या शवावर अंत्यसंस्कारासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची वेळ आली. मात्र, येथील आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेनंतरही या मृतांवरील अंत्यसंस्काराचा प्रवासही दोन-तीन दिवस लांबला होता.
अखेर समन्वयातून निघाला मार्ग -
अखेर नातेवाईकांचा बांध फुटला, संताप व्यक्त होत असताना सर्व स्थरातून प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होऊ लागली आणि मग एक समन्वय बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग काढला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी भोसले यांनी केंद्राने कोविड मृतांच्या अंत्यसंस्काराबाबत असलेले प्रोटोकॉल पाळणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. कोविड रुग्ण ज्या शहरात मरण पावतो, त्याच शहराच्या परिघात त्याच्यावर सुरक्षित अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. बाधित शव जर तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या गावी पाठवले तर गर्दी होणार तसेच बाधित मृतांवर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार न झाल्यास बधितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा धोका त्यांनी समजावून सांगितला. यानंतर आमदार जगताप यांनीही सहकार्याची भूमिका घेत शहरानजीक असलेले केडगाव, नवनागापूर इथे तसेच मनपाचा पंधरा एकरचा ओपन प्लॉट इथे हे अंत्यसंस्कार होऊ शकतात, असे सुचवले. त्या अनुशंगाने रविवारी रात्री 24 शवावर केडगाव उपनगरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार जगताप यांनी सुचवलेल्या 15 एकरच्या प्लॉट मध्ये येत्या गुरुवारपर्यंत अंत्यविधीच्या दृष्टीने योग्य उपाययोजना, सुविधा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले.
कोरोनात माणुसकी मरू देऊ नका -
कोरोनाचा दुसरा स्ट्रेन भयावह आहे. रुग्णांची वाढ होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जीव मरत असले तरी माणुसकी मरु द्यायची का, असा प्रश्न आमदार जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत व्यक्त होत आहे. जवळपास तीन-चार दिवस बाहेरच्या शवावर अंत्यसंस्कार होत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले होते. प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. एक तर तुम्ही तातडीने अंत्यसंस्कार करा, अन्यथा आमचे शव आमच्या ताब्यात द्या, आम्ही अंत्यसंस्कार करू, अशी त्यांची मागणी होत होती.
हेही वाचा - बार्शीत ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू, प्रशासनाकडून आरोप फेटाळले