अहमदनगर - राज्यात हजारोच्या संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड्स,ऑक्सिजन, रेमडेसीवीरचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. जो उपलब्ध साठा आहे त्यातील शासकीय रूग्णालयात किती ठेवायचा आणि खासगी रूग्णालयांना किती द्यायचा याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन वाटपावरून असाच एक वादंग अहमदनगरमध्ये निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच मिळाला नाहीतर कसे होणार -
अहमदनगरमध्ये उपलब्ध झालेल्या एका टँकरमधील ऑक्सिजनच्या वाटपावरून खाजगी डॉक्टर्स आणि जिल्हा रूग्णालयात मोठा वादंग निर्माण झाला. उपलब्ध झालेला एक टँकर पोलीस बंदोबस्तात जिल्हा शासकीय रूग्णालयात आल्यानंतर तो तिथेच संपूर्ण खाली करून घेतला जाणार असल्याची, माहिती खासगी कोविड हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना समजली. यानंतर खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन याचा विरोध केला. त्यामुळे वाद निर्माण झाला. ऑक्सिजन मिळाला नाही तर आम्हाला कोविड पेशंट अॅडमिट कसे करून घेता येतील? असा प्रश्न खाजगी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
शासकीय-खासगी सर्वांना ऑक्सिजन मिळेल -
हा प्रकार गैरसमजुतीने झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे ऑक्सिजन टँकर प्रथम जिल्हा शासकीय रूग्णालयात अर्धा खाली करून घेतला आणि नंतर तो खासगी रूग्णालयांना उपलब्ध करून दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल पोखरणा यांनी स्पष्ट केले आहे.
यंत्रणा अपुऱ्या..प्रशासन हतबलतेकडे -
एकूणच कोरोनामुळे सर्वच यंत्रणा अपुऱ्या पडत असताना आता रूग्णांचे जीव वाचवताना उपलब्ध होत असलेल्या विविध औषध पुरवठ्याच्या वाटपात प्राधान्यामुळे वाद पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन अजूनच हतबलतेकडे जात असल्याची परस्थिती आहे. कोरोना चाचणी, रूग्ण सिटी स्कॅन तपासणी, खाटा उपलब्धतेसाठी रांगेत असलेले रूग्ण, ऑक्सिजनसाठी होणारी तळमळ, रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी नातेवाईक पळापळ या गोंधळात अनेकदा रूग्णांचा बळी जातो. एकूणच परस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा -शासकीय रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन तर खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा