अहमदनगर - औरंगाबादच्या नामांतराचा चांगलाच पेटला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस कधीही नामांतराच्या बाजूने उभी रहात नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी नामांतरावरून भाजपालाही टोला लगावला आहे. राज्यमंत्रीमंडळाने चिकलठाणा विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून त्याला पाच महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यावर केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही, त्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना नामंतराच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस कधीही भावनिक आश्वासने देत नाही -
काँग्रेस पक्ष हा नेहमी सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न करणारा पक्ष असल्याने आमचा नामांतराला विरोध असल्याचे सांगत भाजप या मुद्द्याचा केवळ राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोप केला. निवडणुका आल्या की लोकांच्या भावनिक मुद्द्यांना हात घालण्याची भाजपची परंपरा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष कधीही भावनिक आश्वासने देत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर आमचे राजकारण अवलंबून असते, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या श्रद्धास्थांनाचा राजकारणासाठी वापर न करण्याची अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी राज्यात भाजपने पाच वर्ष सरकार चालविले, त्यावेळी त्यांनी नामांतर का केले नाही, असा सवालही यावेळी उपस्थित केला.
निवडणुका लोकशाहीचा पाया असतात -
छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्याविषयी लिहीलेले लिखाण वाचावे म्हणजे त्या पक्षाची विचारपद्धती समजेल. तसेच निवडणुका लोकशाहीचा पाया असतात, त्यामुळे सरपंच पदासाठी लिलाव पद्धती याेग्य नाही, असेही त्यांनी म्हटले. ग्राम पातळीवरील निवडणुका बिनविरोध करण्यामागे गावातील वातावरण सौहार्दाचे आणि शांततेचे रहावे हा हेतू आहे. गावाने एकत्र येऊन आपल्या गावाचा कारभार चालविणारे सदस्य निवडावे, या मताचे आपण असून त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपण लक्ष घालीत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.