अहमदनगर - श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार कांबळे यांना शिवसेनेत घेऊन त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील पक्षातून गेल्यानंतर काँग्रेसला गळती लागली असून ती थांबायला तयार नाही, असे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत आहेत. अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांच्या नंतर यात आणखी एका आमदाराची भर पडली आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र, माझ्या मनामध्ये काँग्रेसबद्दल राग नसल्याचे कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.