अहमदनगर - अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील आडाचा मळा परिसरात शेतीच्या किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सतीश काशीनाथ वाकचौरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण करण्यात आली. मारहाण सोडवणाऱ्या महिलांनादेखील यावेळी मारहाण करण्यात आली.
अकोले तहसील कार्यालयामध्ये शेतातील रस्त्याचा दावा सुरु आहे. दरम्यान, शनिवारी तहसील कार्यालयात दोन्हीही गटांची बैठक पार पडल्यानंतर हाणामारीची घटना घडली. या मारहाणीत सतीश वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, अनिता वाकचौरे, छाया वाकचौरे, वृद्धा बबई वाकचौरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. तर सतीश वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले.
अकोले पोलीस ठाण्यात पुरूषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून रामभाऊ एकनाथ वाकचौरे, वनिता रामभाऊ वाकचौरे, वृषाली पुरूषोत्तम वाकचौरे, विमल एकनाथ वाकचौरे, एकनाथ बबन वाकचौरे, भाऊसाहेब बबन वाकचौरे, आशा भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अकोले पोलीस करीत आहेत.