अहमदनगर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी हे गाव साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख करत पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आमचा विरोध पाथरीच्या विकासाला नसून, साईंच्या जन्मभुमीचा उल्लेखावर असल्याचे मत व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - 'मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, आता त्यांचा गोंधळ उडालाय'
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कुटुंब साईबाबांचे निस्सीम भक्त असून, मराठवाडा दौऱ्यामध्ये पाथरी गाव साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख चुकून झाला असावा. तसेच हा उल्लेख चुकीच्या माहीतीच्या अधारे केला असावा, या वक्तव्याने नाराजी पसरत असल्याने माहीती जनसंपर्क कार्यालयाकडून संपूर्ण माहिती घेऊन योग्य खुलासा करण्याची मागणी काँग्रेसचे नेते आणि साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी केली आहे.
याआधीही साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा असाच उल्लेख केला होता. त्यावेळीही शिर्डीकरांमध्ये नाराजी होती. त्यानंतर पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थानाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जन्मस्थानाचा उल्लेख केल्याने पुन्हा शिर्डीकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
भाजपचे सचिन तांबे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्र्यांनी चुक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.