अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनच्या पावसाचे दमदार आगमन झाले आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी भात आळवणीला सुरुवात केली आहे. सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थीही पालकांबरोबर भात आळवणीचा आनंद लुटत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे पावसाचे माहेरघर समजले जाते. दरवर्षी सात जुनच्या आसपास वरुण राजाचे भंडारदरा धरणाच्या पाणीलोट क्षेत्रामध्ये दिमाखात आगमन होते. पंरतु यंदा मान्सुनच्या सुरुवातील पाऊस झाला. त्यानंतर पावसात मोठा खंड पडला होता.
![भात लावणीचा आनंद लुटताना शाळकरी मुलगी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-ricefarming-14-viuals-bite-mh10010_14072020011021_1407f_1594669221_131.jpg)
आदिवासी शेतकरी बांधवांनी वळवाच्या पावसावर भाताची रोपे तयार करून कशीबशी वाढविली होती. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने भाताची रोपे जळून जाण्याच्या स्थितीत होती. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
![भात लावणीचा आनंद लुटताना शाळकरी मुलगा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-ricefarming-14-viuals-bite-mh10010_14072020011021_1407f_1594669221_46.jpg)
भात खाचरांमध्ये तुडुंब पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आंनद दिसू लागला आहे. भंडारदरा परिसरातील घाटघर, रतनवाडी साम्रद, उडदावणे, पांजरे व चिचोंडी या ठिकाणी तसेच कळसुबाईच्या पायथ्याशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात लागवड सुरू केली आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मुलांच्या शाळाही बंद आहेत. शाळकरी मुलेही पालकांच्या मदतीसाठी भात लागवडीचे काम शेतात करत असल्याचे भंडारदरा परिसरात दिसत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शाळेचे वेळापत्रक बदलल्याने मुलांना पहिल्यांदाच शेतामधील कामात आनंद घेता येत आहेत.