अहमदनगर : पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (transfer of Rahuri police inspector Pratap Darade) यांच्यावर ब्राह्मणी गावातील धर्मांतराच्या मुद्द्यावरून तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी विधान भवनात केला होता. प्रभारी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक दराडेंच्या बदलीचे आदेश दिले. माञ सदर बदली ही सूटबुद्धी कारवाईतून केली असल्याचा आरोप समस्त राहुरीकरांनी केला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंच्या बदलीच्या निषेधार्थ नगर-मनमाड महामार्गावर (Nagar Manmad highway) चक्का जाम आंदोलन करण्यात (Chakka jam protest) आले. सभागृहात आमदार राम सातपुते यांनी चुकीच्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, सातपुतेंचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. तर दराडेंची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी समस्त राहुरीकरांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक दराडे यांनी अल्पवधी काळात राहुरी मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवला आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येऊ नये आणि झालेली बदली ही तात्काळ रद्द करावी, अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. सुमारे तासभर झालेल्या रास्ता-रोको मुळे नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
सदर आंदोलनामध्ये माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आदिंसह सर्व सर्वपक्षीय, सर्व संघटना, डॉक्टर, वकील, विद्यार्थी, व्यापारी सर्वसामान्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान महामार्गावरुन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी काही काळ रस्ता मोकळा करुन दिला होता.