अहमदनगर - आज देशभरात कोरोनाच्या सावटाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाळ कृष्णाचे गुणगान केल गेले.
रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा साई मंदिरात सुरू आहे. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनामुळे साईबाबा मंदिर गेल्या 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद आहे. त्यामुळे यावर्षींचा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भाविकांविना पार पडला.
साई मंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन आरती करण्यात आली आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदिरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्माचे किर्तन झाल्यानंतर जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवुन त्याची पुजा केली जाते. बाबा हेच आमचे राम, बाबा हेच रहिम, कृष्ण आणि विठ्ठल म्हणत भाविक मनोभावे दर्शन घेत असतात.