अहमदनगर - व्यवसाय सुरू करण्यासाठी पत्नीच्या नावे काढलेला जीएसटी क्रमांक दंड न भरता बंद करून देतो, असे सांगत तसे करण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेत असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. अहमदनगरच्या विक्रीकर विभागातील विक्री अधिकारी आणि श्रीरामपूर येथील कर सल्लागार असणाऱ्या या दोघांना श्रीरामपूर येथील हरीकमल प्लाझातील कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.
हेही वाचा... आता सरन्यायाधीशांचे कार्यालय माहिती अधिकाराच्या कक्षेत
श्रीरामपूर येथील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने पत्नीच्या नावे व्यवसाय सुरू करण्यासाठी जीएसटी क्रमांक डिसेंबर 2018 मध्ये काढला होता. मात्र, काही कारणास्तव ते व्यवसाय सुरू करू शकले नाही. त्यामुळे त्यांनी तो जीएसटी क्रमांक बंद करण्यासाठी श्रीरामपूर येथील खासगी कर सल्लागार निलेश हरदास यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज केला. हा क्रमांक बंद करताना होणारा दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांनी लोकसेवक सुनिल टकले यांच्या करिता काही पैसे मागितले. तडजोडी अंती टकले यांच्यासाठी 3 हजार 500 रुपये लाच आणि स्वतःसाठी पाचशे रुपयांचे कमिशन, असे म्हणून एकूण चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर शहरात हरीकमल प्लाझामधील हरदास यांच्या कार्यालयात ही लाच त्यांनी स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रचलेल्या सापळ्यातील अधिकाऱ्यांसमोर त्यांनी ही लाच स्वीकारली, तेव्हा त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
हेही वाचा... ...तर कुणी माईचा लाल निवडून येणार नाही - अजित पवार