अहमदनगर - महाविद्यालयीन शिक्षणासाठी रांजणगाव येथून कोपरगावला बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला बस कंडक्टरने पासवर शिक्का नसल्याचे कारण देत रस्त्यावर उतरवून देण्याचा प्रयत्न करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार मंगळवारी कोपरगावात घडला. यामुळे पालकांनी तसेच शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांसमोर आपला संताप व्यक्त केला, तसेच संबंधित कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने कोपरगाव बस स्थानकात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पास देण्याचे काम चालू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्याठिकाणी अगदी सकाळी 7 वाजल्यापासुन नंबरला उभे असतात. दिवसभर थांबल्यानंतर याठिकाणी पास मिळतो. पास मिळाल्याने विद्यार्थ्यांना बसने येणे-जाणे सोयीचे होते. रांजणगाव ते कोपरगाव हे २५ किमी चे अंतर आहे. अनेक विद्यार्थी दररोज यामार्गे शाळेत, महाविद्यालयात शिकायला जातात. या अंतराच्या पासची किंमत ७०० रूपये आहे. योगीता खालकर हिने पास काढला त्या पासवर आगारप्रमूखांची सही होती. पण, पास मिळाल्यावर त्यावर शिक्का नसल्याचे कारण देत कंडक्टरने विद्यार्थिनीला बसमधून खाली उतरवून देण्याचा प्रयत्न केला.
एकीकडे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चे ब्रीदवाक्य वापरुन सरकारचे विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याचे धोरण आहे. तर, दुसरीकडे शासनाचाच भाग असलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बस मधून खाली उतरवून देण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून, शासनाची उदासीनता दिसून येत आहे. संबंधित बस कंडक्टरवर काय कारवाई होती याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहेत.