शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाचा वाढता प्रभाव व यामुळे लॉकडाऊनमध्ये केलेल्या वाढीचा फटका लघू उद्योगाला बसत आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील महत्वाचा अशा वीट उत्पादनालाही मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केला यामध्ये वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगारांना काम नसल्यामुळे अनेक कामगार आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे वीट उद्योगावर महामंदी आली आहे.
शिर्डीजवळील पिंपळवाडी परिसरात विटभट्टीचे मोठे आगार आहे. या ठिकाणी लॉकडाऊनमुळे वीटभट्ट्या बंद असल्यामुळे सुमारे 4 कोटींचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान काम बंद असल्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकाला उत्पादन घेता आले नाही. तसेच कच्चा माल पडून असल्यामुळे याचा फटका वीट उद्योगाला बसला आहे.
वीट्टभट्यांचा हंगाम दिवाळीनंतर सुरू होतो. तर तो 30 मे पर्यंत चालतो. मात्र, हंगामाच्या शेवटच्या काही दिवसातच लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे मार्चपासून वीटभट्ट्या बंद आहेत. त्यामुळे पिंपळवाडी, नथुपाटलाची वाडी आणि पुणतांबा या परिसरातील वीटभट्टी चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शिर्डी परिसरातील वीटभट्ट्यांचे 4 कोटींचे नुकसान झाले आहे.
शिर्डी परीसरातील वीटभट्ट्यांवर उत्तर प्रदेशातील जवळपास साडेतीन हजाराच्यावर कामगार काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम नसल्याने येथील अनेक मजूर त्यांच्या-त्यांंच्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक वीटभट्ट्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.