अहमदनगर - शहरात किमान पाच दिवसांचा लॉकडाऊन व्हावा यासह इतर मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. जनतेने मला निवडून दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधी या नात्याने माझे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल तर त्या पदावर राहण्यात काय उपयोग, अशी उद्विग्नता प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे यांनी व्यक्त केली आहे. नगरजवळ विळद इथे स्व. श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोविड सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी ही खंत बोलून दाखवली. कोविड सेंटर उद्घाटन कार्यक्रमास माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, मा. आ. शिवाजी कर्डिले, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे आदी उपस्थित होते.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता विखे यांनी जिल्हा प्रशासनाला शहरात पाच दिवस लॉकडाऊन करावा असे सुचवले होते. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीतही त्यांनी हे मत असून लॉकडाऊनचा आग्रह धरला होता. शिवाय इतर अनेक योजनांबाबत आपले मत व्यक्त केले होते. मात्र, आढावा बैठकीत पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांनी शहरात लॉकडाऊन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रशासन केवळ माझ्याकडून सूचना-मार्गदर्शन घेते. मात्र, त्याची अंमलबजावणी करत नाही अशी, तक्रार खासदार विखे यांनी आता केली आहे. आपल्या सूचना या एक लोकप्रतिनिधी या नात्यासह एक डॉक्टर या नात्याने होत्या, त्या ऐकल्या गेल्या असत्या तर आज कोरोनाची जी परस्थिती शहरात आहे. त्यापेक्षा निश्चित चांगली असणार असा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्राचा निधी तालुका ग्रामीण रुग्णालयात वापरा -
केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी येणारा शंभर कोटींचा निधी हा इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी वापरू नका, तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, डायलिसिस यांसारख्या अत्याधुनिक सुविधेसाठी वापरावा, जेणेकरून रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेणार नाहीत आणि शहरातील रुग्णालयावर अधिक भार येणार नाही, अशी मागणी खासदार विखे यांनी केली आहे.