शिर्डी - नवाब मलिकांनी जी नवीन वनस्पती शोधली आहे, ती शेतकऱ्यांना पुरवा आणि कृषी खात्याला आदेश द्या. शेतकऱ्यांना त्या वनस्पतीचे बी मिळाले तर त्यांचा लाखो रुपयांचा फायदा होईल असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यातील महालगाव येथील गोधन दूध संस्थेच्या रिबीट वाटपप्रसंगी ते बोलत होते.
'इतर प्रश्न संपले का?'
ते पुढे म्हणाले, की शाहरुख खानचा पोरगा गांजा पितो की काय करतो? सचिन वानखेडे बिचारा काय करत होता हे गेले 25 दिवस सुरू होते. देशात आता इतर प्रश्नच शिल्लक नाहीत का, असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
'अनुदान न देता लाटले पैसे'
मागील सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले होते. मात्र शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केलेत. कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे सुतोवाच विखे पाटलांनी केले.
'ते शेतकरी आंदोलन करणार'
दिपावलीत अनेक दूध संस्था शेतकऱ्यांना रिबीट वाटप करत आहेत. या विषयाचा आधार घेत विखे पाटलांनी थोरातांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. संगमनेरमधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले, अन् तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आल्याचे ते म्हणाले. ते शेतकरी आता आंदोलन करणार असल्याचेही विखे पाटलांनी सांगितले.