अहमदनगर - राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे अद्यापही बंद असल्याने आता भारतीय जनता पक्ष मंगळवारपासून आक्रमक झालेला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
जामखेड येथील मक्का मशीद याठिकाणी अल्पसंख्यांक समितीचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मस्जिद खोलो मस्जिद खोलो, ठाकरे सरकार मस्जिद खोलो, अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे त्वरित सुरू करावेत, अन्यथा अल्पसंख्यांक समाज ठाकरे सरकार विरोधात मोठे आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यात इतर ठिकाणी विशेष करून हिंदू मंदिरे सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन होत असताना आता अल्पसंख्याक समाज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करत प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आंदोलन करताना दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जामखेड-कर्जत मतदार संघातील अल्पसंख्य समाजाचे अनेक कार्यकर्ते यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा - मंदिरे उघडण्यासाठी साधूंचे शिर्डीत आंदोलन