अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज शिर्डीत भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी भाषण करून निघत असताना त्यांना चक्कर आली.
याप्रकारामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. शिर्डीच्या विमानतळावर डॉक्टरांनी गडकरींच्या प्रकृतीची तपासणी केली. यावेळी त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता झाली तसेच रक्तदाबही कमी झाल्याने त्यांना भोवळ आली. आता मात्र, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती विमानतळावरील डॉक्टरांनी दिली. गडकरींच्या शरीरातील साखरेचे प्रमाण आता ठिक असून ते नागपूरकडे रवाना झाले आहेत. याआधीही गडकरींना राहुरी येथील एका कार्यक्रमात चक्कर आली होती.