अहमदनगर - काँग्रेसला जय महाराष्ट्र करून शिवसेनेकडून उमेदवारी करणारे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शुक्रवारी संगमनेरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर, त्यांनी थोरात यांच्या सत्कार करून पाया पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
भाऊसाहेब कांबळे गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसचे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, या विधानसभेला त्यांनी बाळासाहेब थोरतांची साथ सोडत श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी दिलेला काँग्रेसचा उमेदवार आणि नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांनी कांबळे यांचा दारुण पराभव केला होता.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात, देशभरातील ३६ राज्याचे संघ सहभागी
शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुख संगमनेरच्या दौऱ्यावर होते. यावेळी लोकसभेचे पराभूत उमेदवार भाऊसाहेब कांबळेदेखील त्यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, थोरातांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे कांबळे यांनी आज चक्क त्यांचा सत्कार करून पाया पडून नमस्कार केला. यामुळे, राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले असून कांबळे पुन्हा काँग्रेसमध्ये येतात की काय, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा - राज्यमंत्री तनपुरे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट..