अहमदनगर : 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपरे या मंगळवारी लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्या आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगतील.
लोकसभा पोर्टलवर होणार थेट प्रक्षेपण..
19 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल, व पुढील एक तास ते सुरू राहील. या दरम्यान त्या आपल्या जीवन प्रवासाबद्दल आणि करत असलेल्या कार्याबद्दल माहिती देतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले जाणार असून, ते लोकसभा पोर्टलवर आणि वाहिनीवरही दाखवले जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर सीमा कौल सिंह यांनी दिली.
कोण आहेत राहीबाई?
आजपर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील रहिवासी आहेत. राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक आपल्या राहत्या घरी छोट्याशा झोपडीत 'बायफ' या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू केली होती. २०१४मध्ये बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर राहीबाई यांचा प्रवास सातत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी बीज निर्मिती आणि वितरण करून सुरू आहे. राहीबाई यांनी बायफ संस्थेच्या मदतीने कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून, त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीजी संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मान..
आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित राहीबाई यांनी आपले जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार यापूर्वी प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच, त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरणही लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना त्या काय मार्गदर्शन करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशविदेशात आहे ख्याती..
बायफ या संस्थेने सुरू केलेल्या देशी बीज संवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशातही घेण्यात आलेली आहे. त्यानुसार गावोगावी प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत आहे .त्या पार्श्वभूमीवर राहीबाई आणि बायफच्या तज्ज्ञांचे पथक येत्या 19 तारखेला लोकसभा सदस्यांना काय संबोधित करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषय तज्ज्ञ संजय पाटील आणि विभागीय अधिकारी जितिन साठे हे सौ. राहीबाई पोपरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव