अहमदनगर - विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने, बहुतांश आमदार मतदारसंघात आहेत. त्यामुळे राज्यपालांची भेट घेणे रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच शिवसेना आणि आघाडी यांच्यात सरकार स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे. संगमनेर येथे पत्रकारांसोबत थोरात बोलत होते.
हेही वाचा... भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर
राज्यपालांची भेट घेण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने वेळ मागितली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचे हिशोब सादर करण्याची शेवटची मुदत असल्याने आणि बहुतांश आमदार हे त्यांच्या मतदारसंघात असल्याने, शनिवारी घेण्यात येणारी राज्यपालांची भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे दिली.
हेही वाचा... नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले
राज्यात सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांच्या बरोबर आमचीही भूमिका, सरकार पाच वर्षे चालावे अशीच आहे. त्यामुळे सरकार पाच वर्षे टिकवायचे असल्याने सर्वच गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. कोणतीही शंका न ठेवता पुढे गेले पाहिजे, त्यासाठी चर्चा सुरू आहेत. दिल्लीतही याबाबत चर्चा केली जात आहे. काही दिवस लागतील मात्र सर्व व्यवस्थित होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा... राज्यभरात राहुल गांधींविरोधात आंदोलन, राफेलसंदर्भात जाहीर माफी मागण्याची मागणी
राज्यात सरकार स्थापनेचा विषय चालू असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्याबाबत अजून कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाही, मात्र स्थानिक पातळीवर भाजपला दूर ठेवण्यासाठी कार्यकर्ते संख्याबळासाठी काही निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता थोरात यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील की नाही, याबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे.