अहमदनगर - स्वरसम्राज्ञी, भाररत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे ( Lata Mangeshkar Passes Away ) वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या दैवी स्वरांच्या माध्यमातून जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. लतादीदी आज शरीराने आपल्यातून निघून गेल्या असल्या, तरी आपल्या सुमधुर स्वरांनी त्या अजरामर झाल्या असून गाण्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत कायमच राहतील, असा अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat On Lata Mangeshkar Death ) यांनी शोक व्यक्त केला आहे.
'भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली' -
लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, लता दीदींना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार'देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
'मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी' -
माझे वडील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भाऊसाहेब थोरात यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान व ह्रदयनाथ मंगेशकरवतीने जीवनगौरव पुरस्कार दिला होता. या सोहळ्यात लतादीदींनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते, ही आठवण थोरात कुटुंबियांच्या कायम स्मरणात राहील. माझे शासकीय निवासस्थान लतादीदींच्या निवासस्थानाच्या जवळ आहे. मात्र, त्यांची भेट झाली नाही, असे मी मागे एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की बाळासाहेब कोविडमुळे मला घराच्या बाहेर पडता येत नाही आणि कोणाला घरी बोलवता येत नाही. कोविड संपल्यावर आपण नक्की भेटू. मात्र, आता ती भेट होणार नाही, याची खंत मला कायम राहील. लतादादींची गाणी भविष्यात ही चाहत्यांना आनंद देत राहतील व त्या आपल्या गायनाने सर्वांच्या आठवणीत चिरकाल राहतील. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे महसूलमंत्री म्हणाले.
हेही वाचा - Lata Didi Life Journey : मध्ययुगाचा आवाज शांत झाला! वाचा लतादीदींचा जीवनप्रवास