अहमदनगर - 'भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपल्या आयुष्यास मार्गदर्शन करणार्या गुरुजनांप्रती आपण आदरभाव व्यक्त करतो. शिक्षक हे भावी पिढी घडविण्याचे काम करत असून त्यांचे देशाच्या व समाजाच्या विकासात मोठे योगदान आहे.' असे गौरवौद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, 'आई - वडिलानंतर प्रत्येकाच्या जीवनात गुरुंचा मोठा वाटा असतो. प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालयीन जीवनात वेगवेगळे शिक्षक मार्गदर्शन करत असतात. शिक्षक हे पवित्र ज्ञानदानासोबतच उज्ज्वल पिढी घडवितात. मी जि.प. शाळेत शिकलो. ते शिक्षक, माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षकांच्याप्रती आजही मनामध्ये आदर आहे. प्रत्येकाने आपल्या गुरुंप्रती 'थॅक्यू टिचर' म्हणत आदर व्यक्त करावा. राज्यात वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग काम करतो आहे. कोरोनाच्या काळात अनेक शिक्षकांनी काम केले. अनेकांनी विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांपर्यत पोहचून मार्गदर्शन करत राहिले. या सर्वांच्या कार्याच्या आजच्या प्रसंगी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे म्हणाले, भारतीय संस्कृतीत शिक्षकांना आई वडिलानंतरचे स्थान आहे. पुरातन काळापासून प्रत्येक कर्तृत्वान व्यक्तींना घडविण्याचे कार्य शिक्षकांनी केले आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम हे व्रत मानणाऱ्या या शिक्षकांचे 5 सप्टेंबर निमित्त अभिनंदन केले पाहिजे. स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण अशी मोठी परंपरा असलेल्या या क्षेत्रात अनेक समस्याही आहेत, परंतु शासनाने शिक्षणाचा अधिकार देऊन सर्वांच्या शिक्षणासाठी कटीबद्धता राखलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - शिक्षक दिन विशेष : अँड्रॉइड फोन नसल्यामुळे अंजलीसाठी रात्रीचा वर्ग; शिक्षिकांचा 'आदर्श' उपक्रम