अहमदनगर - जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेतशिवारात एक स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील शेतमजूर महिला कांदे काढणीसाठी सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर गावचे सरपंच ज्ञानदेव निमसे यांना कळवण्यात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी कैलास कानवडे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना बोलावण्यात आले.
शेवगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अर्भक देखभालीसाठी आरोग्य विभागाच्या ताब्यात दिले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेवगाव तालुक्यात अवैधरित्या गर्भलिंग तपासणी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलीस आणि शासकीय आरोग्य यंत्रणेने याचा छडा लावावा, असेही बोलले जात आहे.