अहमदनगर - पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आवाजातील अकरा मिनिटांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी लोकप्रतिनिधी, वरिष्ठाना कंटाळून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तहसीलदार देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये कुणाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख हा पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी नुकतेच झालेल्या प्रकारांचा संदर्भ देत आ. लंके यांच्याकडे इशारा केला आहे.
अधिकृत स्पष्टीकरण नाही
एक महिला अधिकारी असल्याने लोकप्रतिनिधी, शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामकाजात अडथळे आणले जातात, मानसिक त्रास दिला जातो आणि सतत उपोषणे, आंदोलन करून नेते मंडळी जाणीवपूर्वक आडकाठी आणतात, असे अनेक आरोप या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. याबाबत त्यांनी त्यांच्यावतीने अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाहीत, मात्र एकूणच या ऑडिओ क्लिपनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांचाही त्यांनी क्लिपमध्ये उल्लेख केला आहे.
आ. लंकेंचा ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
आज (शुक्रवारी) पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार यांनी माध्यमांशी बोलताना तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या अनेक कामात भ्रष्टाचार झालेला असून याबाबतीत त्यांची विभागीय आयुक्तांकडून चौकशी झाली असल्याचे आणि त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. आपल्यावर गंभीर कारवाई होईल यामुळे त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी ऑडिओ क्लिपचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी यापूर्वीही अशा धमक्या देऊन लोकप्रतिनिधी, तालुक्यातील शासकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.