अहमदनगर : विधान परिषदेसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तांबे कुटुंबियांमुळे सध्या राज्यात चर्चेत आहे. निवडणूकीतील प्रचारासाठी सत्यजीत तांबेंनी प्रचाराला सुरूवात केली असून त्यांनी मतदारांसोबत संवाद साधला. धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर व नाशिक या पाचही जिल्ह्यातील मतदारांनी जसे सुधीर तांबे यांच्यावर तीन वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केले. त्या पद्धतीचे प्रेम माझ्यावर करावे, असे आपल्या सगळ्यांना विनंती करतो, असे आवाहन अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. संगमनेर तालुक्यातील काही गावांना भेटी देत आहेत. दरम्यान त्यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
वडीलांचे मतदार संघातील कार्य यशस्वीपद्धतीने : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 20 तारखेला होत आहे. मागचे पंधरा वर्षे या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचे काम माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी अतिशय यशस्वी पद्धतीने केलेले आहे. मागच्या पंधरा वर्षांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक या पाचही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांचे जन्मगाव चोंडीपासून ते गुजरातची बॉर्डर असलेल्या धडगाव तालुक्यापर्यंत प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन प्रश्न सोडवले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, औद्योगिक क्षेत्रातील लोकांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार, कृषी शेतकरी, तरुण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पदवीधरांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचे काम डॉ. सुधीर तांबे यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले.
वडीलांचे कार्य पुढे घेऊन जाणार : ते पुढे म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांच्या स्वभावातून, वागण्यातून, कामातून त्यांनी या पाच जिल्ह्यांमध्ये माणसे जमवलेली आहेत. ती माणसे आता पक्ष किंवा कुठल्याही विचारधारेच्या पलीकडे जाऊन हे सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा राहायचे म्हणत आहेत. सुधीर तांबे यांनी आजपर्यंत काम केलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर आताही निवडणूकमध्ये रिंगणात उतरलेलो आहे. निश्चित खात्री आहे की, त्यांनी जे काम मागच्या पंधरा वर्षात केलं ते पुढे घेऊन जाण्याचे काम यशस्वीपणे करेन. पंधरा वर्षात त्यांनी या पाच जिल्ह्यातील लोकांशी जो ऋणानुबंध तयार केलेला आहे. तो ऋणानुबंध तेवढ्याच ताकतीने पुढे घेऊन जाण्याचे काम कारकिर्दीत करेन, असे त्यांनी सांगितले.
योग्यवेळी भूमिका मांडणार : मागच्या पाच-सात दिवसांपासून आपण बरच राजकारण टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिले असेल. याच्यावर आता खूप राजकारण झाले. या सगळ्या राजकारणावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच परंतु आता सध्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष करुन युवकांना आवाहन आहे की एक युवक प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी अजून ताकदीने आता उतरुन या निवडणुकीमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
हेही वाचा : Kasba Constituency By election : कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविण्यास मी इच्छुक-शैलेश टिळक