अहमदनगर - राज्यात गाजलेल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम किंवा उमेश यादव पाटील यांची सरकारने नियुक्ती करावी, अशी मागणी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने केली आहे. रुणाल जरे आणि जरे यांच्या वतीने सध्या काम पाहत असलेले अॅड. सचिन पटेकर यांनी ही मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्र पाठवून केली आहे.
बाळ बोठे शातीर ब्लॅकमेलर गुन्हेगार
या पत्रात म्हटले आहे की, या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली असून हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा अद्याप फरार आहे. त्याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र बोठे हा चतुर, शातीर असून सूडबुद्धीने वागणारा आहे. घटनेला दीड महिना होत आला असला तरी पोलीस त्याला शोधू शकले नाहीत त्यामुळे संशय वाढला आहे. बाळ बोठेचा पुर्वइतिहास पाहिला तर थक्क करणारा आहे, तो गुन्हेगारी स्वभावाचा ब्लॅकमेलर असल्याचे आता पुढे येत आहे.
खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा
इतर पीडित आता पुढे येत त्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे बोठे याला अटक करून तपास पूर्ण करून हा खटला त्वरित सुनावणीस येणे गरजेचे आहे. राज्यात हे प्रकरण गाजत असून चर्चेचा विषय बनले आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी होणे गरजेचे असल्याने सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम किंवा उमेश यादव पाटील यांची नियुक्ती करून हा खटला फास्टट्रक कोर्टात चालवावा, अशी मागणी रुणाल जरे आणि सचिन पटेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - कोरोना लस सर्वांना मोफत द्या, संसदीय समितीची शिफारस