अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यांचे वजन कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तत्काळ उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे.
अण्णांचे वजन साडेपाच किलोने कमी झाले असून उपोषण करणाऱ्यांसाठी आरोग्यदर्शक असलेला युरिन किटोन ३ पेक्षा अधिक झाल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. अण्णाच्या किडनी आणि मेंदुला धोका असल्याची भीती अण्णांची नियमित तपासणी करणारे डॉक्टर धनंजय पोटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकूणच राळेगणसिद्धी परिवार आणि अण्णा समर्थक कार्यकर्त्यांत अण्णांच्या तब्येतीबद्दल आता काळजी आणि चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थांनी चुलबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि विविध खात्यांचे सचिव थोड्याच वेळात राळेगणसिद्धीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.