अहमदनगर - तीन वर्षे झाली केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र ते आतापर्यंत लागू केले नाही. जर केंद्र सरकार मागण्या मान्य करणार नसेल तर जानेवारीत दिल्लीत जाऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी हा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
अण्णा हजारे निर्णयावर ठाम-
हजारे यांनी नवीन वर्षात एक प्रसिद्धी पत्रक काढले. यामध्ये त्यांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहेत. सरकार तीन वर्षांपासून आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. यापुर्वी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी मध्ये जाऊन अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र सरकारने लेखी आश्वासन दिलेल्या मागण्या लागू करा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहेत अण्णांच्या मागण्या-
स्वामिनाथन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला असून त्याप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी या निकषानुसार शेतमालाला हमीभाव देऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचप्रमाणे धान्य, कडधान्य याबरोबरच फळे, दूध, पालेभाज्या, बटाटा, टोमॅटो यांना सुद्धा हमीभाव दिला जावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्त संवैधानिक दर्जा द्यावा दिला जावा, राज्य कृषी आयोगाने राज्यातील परस्थिती प्रमाणे घोषित केलेले कृषिभाव केंद्रीय आयोगाने आहेत तसे मान्य करावेत, अशा अण्णांच्या मागण्या आहेत. यासर्व मागण्यासाठी अण्णा आग्रही असून या चालू जानेवारी महिन्यात दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन करणारच, असा इशारा अण्णांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकारला दिला आहे.
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची हेळसांड-
या कृषिप्रधान देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. मात्र आज सरकारला याचा विसर पडत असल्यानेच शेतकऱ्यांना या देशात न्याय मिळत नाही. त्यासाठीच आपण गेली चार वर्षांपासून सरकार विरोधात आंदोलन करत असून पुन्हा एकदा आंदोलनावर ठाम असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाच्या धर्तीवर संविधानिक दर्जा, धान्य मालबरोबरच फळे, दूध, भाजीपाला यांना सी-टु प्लस फिफ्टी प्रमाणे हमीभाव या आपल्या मागण्या सरकारने दिल्लीतील रामलीला मैदान आणि राळेगणसिद्धी येथील आंदोलनाच्या वेळी मान्य केल्या. मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आपण केंद्र सरकारला दिल्लीत रामलीला अथवा जंतरमंतर येथे आंदोलनासाठी जागा मागितली असून आपण आंदोलनावर ठाम असल्याचे अण्णा म्हणाले.
हेही वाचा- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी केले सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
हेही वाचा- लसीला परवानगी मिळाल्यानंतर अदर पुनावालांनी व्यक्त केला आनंद