अहमदनगर- जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. चार भिंतीच्या आत आपण ईश्वर सेवा करतो, पण तोच ईश्वर हा जनसामान्यांत असतो. राज्यात अनेक आमदार आहेत, पण आमदार असलेले निलेश लंके हे एक जनसेवक आहेत. त्यांचे कार्य केवळ एका कोविड सेंटरसाठी दिसत असले तरी ते राज्य आणि देशासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या या जनसेवेसाठी निलेश लंकेना एकशे पाच वर्षांचे आयुष्य लाभो असा आशीर्वाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी 'शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर' हे केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी अण्णांनी आमदार निलेश लंकेंच्या कामाचे भरभरून कौतुक करत त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला.
अण्णा म्हणाले, अनेक आमदार लोकप्रनिधी आहेत, ते कामही करतात पण निलेश लंके यांचे जनसेवेसाठी सतत कार्यमग्न असणे हे एक उत्तम उदाहरण आहे. ते आमदार नसतानाही त्यांनी जनतेसाठी विविध कामे केली आहेत. मात्र कोरोना काळात त्यांनी ज्या पद्धतीने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे, ते पहाता त्यांचे काम हे आदर्शवत आहे. या ठिकाणी रुग्णाला आपण रुग्ण असल्याचे वाटत नाही. कित्येकजण याठिकाणी बरे होऊन घरी जात आहेत. आमदार लंके हे रुग्णांच्या सतत सोबत असतात. त्यांना आधार, धीर देताना सर्व व्यवस्था चोख ठेवतात. विविध कार्यक्रम सेंटरवर ठेवून रुग्णांना विरंगुळा देतात. त्यामुळे हे रुग्णालय न राहता खऱ्या अर्थाने आरोग्य मंदिर झाले आहे, असे गौरवोद्गार आमदार निलेश लंके यांच्या कार्याबद्दल अण्णा हजारेंनी व्यक्त केले आहेत.
अण्णांचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत-
आमदार लंके यांच्या भाळवणी येथील कोविड सेंटरमधील रुग्णांशी अण्णांनी राळेगणसिद्धी मधून ज्यावेळी संवाद साधला, त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अण्णांनी प्रत्येक वाक्यात आमदार लंकेचे कौतुक केले आहे. अण्णांच्या या निर्भेळ कौतुकाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे अण्णांचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे काही मुद्यांवरील 'सख्य' सर्वश्रुत आहे. लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून त्यांनी या कोविड सेंटरला शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर असे नाव दिले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी मोकळ्या मनाने लंकेच्या कामाला दिलेली दाद ही वैशिष्ट्यपूर्ण आणि अण्णांच्या समाजसेवक या उपमेला सार्थक असल्याचे बोलले जात आहे.