अहमदनगर - केंद्र सरकारने केलेल्या शेती विषयक कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आज राळेगणसिद्धीतील गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करत आहेत.
हेही वाचा - 'नाक दाबा, सरकार बरोबर तोंड उघडेल'; भारत बंदला अण्णा हजारेंचा पाठिंबा
देशात शेतकरी विरोधी कायदे नको-
आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी हित याला प्राथमिकता हवी. स्वामीनाथन आयोग, कृषी मूल्य भाव (एमएसपी) यावर अंमलबजावणी केली पाहिजे. शेती खर्च अधिक पन्नास टक्के या प्रमाणे शेतकऱ्यांना सर्व पीक, भाजीपाला, फळे याला भाव दिला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि आंदोलन पण करणार नाही. मात्र, हे न होता नव्याने कायदे होत असताना शेतकरी आता मेटाकुटीला आला असून, देशव्यापी आंदोलन करत आहे. यासर्व बाबींचा सरकारने गांभीर्याने विचार केलाच पाहिजे, त्यासाठी आपण आज एकदिवसीय उपोषण करत असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.
अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन-
सध्या दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे महत्वाचे आहे. देशभरातून त्याला पाठिंबा मिळत आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहून त्यातून त्वरित मार्ग काढावा. अन्यथा अण्णा हजारे आपल्या आयुष्यातील शेवटचे बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. आज अण्णांनी केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे.
हेही वाचा - पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न; रामदास आठवलेंचा आरोप