अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नुकताच छत्रपती शाहू महाराज पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्काराबद्दल अण्णांना विचारले असता त्यांनी, आतापर्यंत मिळालेल्या इतर पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार मिळणार असल्याने खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शाहू महाराजांनी अवघा दिन-दलित-बहुजन समाज एकत्र आणला. एका छत्रपती राजाने केलेले सामाजिक कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा किंवा पद्मश्री,पद्मभूषण या पुरस्कारांपेक्षा शाहू पुरस्कार जास्त महत्वाचा वाटतो. या पुरस्काराने 82व्या वर्षी अजून दोन पावले पुढे जाऊन काम करण्याची उमेद निर्माण झाल्याचे अण्णा म्हणाले.
लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य होणार -
केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होणार असल्याबद्दल अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे. जुना लोकायुक्त कायदा हा कुचकामी होता. आता लोकपालच्या धर्तीवर असणारा लोकायुक्त हा मजबूत आणि स्वतंत्र असणार आहे. म्हणून हा लोकायुक्त कायदा अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधींना नको होता. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकपालच्या धर्तीवरील लोकायुक्त कायद्याच्या अमलबजवणीस सकारात्मकता दाखवली. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असल्याची माहिती अण्णांनी दिली. पुण्यात 'यशदा' इथे सिव्हिल सोसायटी आणि सरकारच्या प्रतिनिधींची २ दिवसीय बैठक समाधानकारक झाल्याचेही अण्णांनी सांगितले.