अहमदनगर- लोकांनी, लोकांसाठी, लोकसहभागातून अपेक्षित असलेली लोकशाही देशात आलीच नाही. त्या ऐवजी पक्ष-पार्टिशाही आली. त्यामुळे आता खऱ्या लोकशाहीसाठी संघटन तयार करून सरकारविरोधात दबावगट निर्माण करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचा मानस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केला आहे. अण्णांनी एक प्रसिद्धपत्रका द्वारे हा माहिती दिली आहे.
दहा मार्चपर्यंत संपर्क साधण्याचे अण्णांचे आवाहन-
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले उपोषण मागे घेतल्यानंतर जवळपास महिनाभर शांत राहिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे देशव्यापी जाळे उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना 10 मार्च पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कार्यकर्त्यांमार्फत विविध प्रश्नांवर एकाच वेळी देशभर आंदोलने करून सरकारवर दबाव आणण्याची त्यांची योजना आहे. पक्ष-पार्टीला खरी लोकशाही दाखवून देण्यासाठी ही चळवळ असल्याचे अण्णांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शेतकरी आंदोलन स्थगितीनंतर अण्णा लागले पुन्हा कामाला-
यापूर्वीही हजारे यांनी अनेकदा अशी आवाहने केली आहेत. त्यानुसार काही कार्यकर्ते त्यांच्या चळवळीशी जोडले गेले त्यातील काही अजूनही टिकून आहेत, तर काही काळाच्या ओघात दुरावले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेले आंदोलन हजारे यांनी आश्वासनानंतर मागे घेतले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली. त्यानंतर आता महिनाभरात हजारे यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे.
जनतेच्या लोकशाही ऐवजी देशात पक्ष-पार्टीशाही आली-
अण्णांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर घटनेत अपेक्षित असलेली खरी लोकशाही आली नाही. 1952 मध्ये देशांमध्ये पहिली निवडणूक झाली. घटनेत पक्ष आणि पार्ट्यांना स्थान नाही, तरीही पहिल्याच निवडणुकीत पक्ष आणि पार्टी यांनी घटनाबाह्य निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन निवडणूक आयोगाने पक्ष पार्टीच्या निवडणुकीला मनाई करायला हवी होती पण तसे झाले नाही. तीच पद्धत आता पर्यंत सुरू आहे. त्यामुळे देशात, लोकांची लोकांनी लोकसहभागातून चालवलेली लोकशाही यायला हवी होती ती आली नाही. त्याऐवजी पक्ष-पार्टीशाही आली. पक्ष आणि पार्टीने लोकशाहीला देशात येऊच दिले नाही. त्यामुळे लोकसभा ही लोकांची असायला हवी होती. पण तसे न होता लोकसभा ही पक्ष आणि पार्ट्यांची झाली. त्यांचे समूह निर्माण झाले, या समुहामुळे देशात भ्रष्टाचार वाढत गेला. गुंडगिरी सुद्धा वाढली. जनतेच्या तिजोरीची लूट वाढत गेली. जाती-पाती मध्ये धर्म वंश द्वेषभावना वाढत गेल्या. विकासाला खीळ बसली, अशा अवस्थेत पक्ष-पार्ट्या विरहित जनशक्तीचा दबावगट निर्माण होणे ही काळाची गरज झाली आहे, असे अण्णा म्हणतात.
अहिंसेच्या मार्गाने आंदोलने करून दबावगट तयार करणार-
सरकार कोणत्याही पक्ष पार्टीचे असो त्यांच्यावर जनशक्ती दबाव असला पाहिजे. चारित्र्यशील समविचारी कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे झाले तर पक्ष आणि पार्टीशाही वर जनशक्तीचा मोर्चे, धरणे, मौन, उपोषण या सारख्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलने करून दबाव निर्माण करता येतो. त्यातून आपण आपली खरी लोकशाही राबवू शकतो. गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रात बऱ्यापैकी संघटन उभे झाले आहे. पुढील काळात अहिंसेच्या मार्गाने समविचारी लोकांचे जनहितासाठी आणि राज्य हितासाठी एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयासमोर आंदोलने झाली तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील, असा विश्वास वाटतो, त्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या ध्येयवादी कार्यकर्त्यांचे संघटन वाढविण्याचे कार्य सुरू झाले आहे, असेही अण्णांनी पत्रकात म्हटले आहे.