अहमदनगर - केंद्र सरकारने तीन कृषी कायदे संमत केल्याच्याविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू आहे. (delhi farmers agitation) यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राने केलेले कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. (pm modi announcement over farm law) पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया येत असून यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (anna hajare reaction on farm law repealed)
विरोधी पक्षांचे नव्हे आंदोलनाचे यश -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घोषित केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा देशातील शेतकऱ्यांच्या एकत्रित आंदोलनाचा विजय आहे. हे यश विरोधी पक्षाचे नसून केवळ संघटितपणे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, देशाचा इतिहास आहे की लाखो लोकांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. त्याच पद्धतीने शेतकरी करत असलेले आंदोलन मिळालेले यशाचे श्रेय त्यांच्या आंदोलनाला द्यावे लागेल.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या संघर्षाला 'सलाम'; कृषी कायदे रद्द केल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना द्या -
कृषी मालाला भाव हा खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती. मात्र, या कायद्यामुळे हे मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे शेतकरी नाराज होता आणि आंदोलन करत होता. केवळ पंजाब, हरियाणा नव्हे तर देशातील अनेक राज्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेला होता. त्यामुळे केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहे, ही चांगली गोष्ट आहे. याबद्दल मी समाधानी असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळाल्यास त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार नाही. आता झालेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. शेतकऱ्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, असेही अण्णा म्हणाले.