अहमदनगर - अयोध्येतील विवादित जागेबाबत आज (शनिवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक असून लोकतांत्रिक दृष्टीने महत्वाचा असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर अनेक वर्षे वाद झडले आहेत. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसमावेशक मानून त्याचा आदर राखत त्या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले पाहिजे, असे अण्णा म्हणाले.
हेही वाचा - उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होणार - दिपक केसरकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेवर हा देश स्वातंत्र्यानंतर 73 वर्षांनंतरही गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे. अनेक भाषा, धर्म, पंथ, रंग-रूप वेगळे असले तरी अनेकतेत एकता टिकून आहे ती न्यायव्यवस्थेमुळे, त्यामुळे हीच एकता आणि सामंजस्य सर्वांनी टिकवून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. न्यायालयाने वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देताना मशीदीसाठी इतरत्र 5 एकर जागा देण्याचा निर्णय दिला आहे. आता ही धार्मिक स्थळे फक्त धार्मिक स्थळे न राहता त्यातून त्या-त्या धर्म महापुरुषांनी दिलेला संदेश, आदर्श आपण जीवनात आणून समाज, देशाचा विचार केला पाहिजे, असे आवाहनही अण्णांनी दोन्ही समाजबांधवांना केले.
हेही वाचा - अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शिवसेनेने टोल नाक्याला ठोकले टाळे
आता राजकारण थांबेल -
या विवादित मुद्यावर राजकीय पक्षांनी अनेक वर्षे राजकारण केल्याचे अण्णांनी स्पष्टपणे सांगत, आता मात्र न्यायालयाने सर्व मुद्यावर स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यामुळे या मुद्यावर राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचे राजकारण थांबेल, असा टोला अण्णांनी लगावला.