अहमदनगर: अकोले तालुक्यातील (Akole Tahsil) कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णवंती नदीपात्रात पर्यटकांच्या गाडीला, काल रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास अपघात (Car Accident of tourists) झाला. हे पर्यटक औरंगाबाद येथील होते. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याचवेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत (Krushnavanti River) वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसिपिने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणल्या गेले आहे.
आशिष प्रभाकर पोलादकर, रमाकांत प्रभाकर देशमुख, वकील अनंत रामराव मगर हे तीघे युवक संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांना भंडारदरा येथे पर्यटनासाठी जायचे होते. मात्र त्यांचा रस्ता चुकला ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशि फाट्याच्या पुढे गेले. रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते. यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटा कार थेट सरकत जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. त्याचवेळी बोलेरो गाडीतील एक प्रवाशी लघु शंकेसाठी थांबला. परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला आहे.आज शनिवारी त्याचा शोध घेण्याचे काम चालू होते.
ही घटना परिसरातील शेंडी येथील राजू बनसोडे, दीपक आढाव या दोन युवकांनी पाहिली. त्यांनी तात्काळ राजूर पोलिसांना फोन केला. राजुर पोलीस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यावेळी दहा वाजले होते. मुसळधार पाऊस,घोंगवणारा वारा सुरु होता. तरी देखील, अंधारात सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे,हेड कॉ्स्टेबल काळे,दिलीप डगळे,अशोक गाडे,विजय फटांगरे, आदी पोलिसांनी मदत कार्य हातात घेत ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजता अपघातग्रस्त क्रेटा जेसी पी व ट्रॅक्टरच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढली.
रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मदतीसाठी बुडालेल्या युवकाचा मृतदेहही घटनास्थळापासून 300 फुटावर पोलिसांना सापडला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत होते. आदिवासी उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे यांना घटनेबाबत समजताच तेही तात्काळ अपघात स्थळी मदतीसाठी दाखल झाले. गेल्या दहा दिवसापासून भंडारदराच्या पाणलोटात प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसातही पर्यटक पाऊस व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भंडारदरा परिसराकडे येत आहेत. परंतु पावसामुळे या भागातील रस्ते व वाटा निसरड्या झाल्या आहेत. वळणाच्या ठिकाणी पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. आज याच कारणामुळे दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे पर्यटनासाठी भंडारदयाला येणाऱ्या पर्यटकांनी धोका टाळून पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राजुर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
आशिष पालोदकर हे अविवाहित होते. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते. ते जिल्हा कोर्टात वकिली करीत होते. रमाकांत देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते शेती करायचे. वाचलेला मित्र अनंत आपल्या मित्रांचे मृतदेह पाहून ओक्साबोक्शी रडू लागला व बेशुद्ध पडला. त्याच्यावर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.