अहमदनगर - शहरानजीक असलेल्या केके रेंज या युद्ध सराव भूमीवर सोमवारी 'एसीसी अँड एस' या लष्कराच्या यांत्रिकी पायदळाचा वार्षिक सराव अभ्यास पार पडला. चित्तथरारक प्रात्यक्षिकांवेळी देशाचे व मित्र राष्ट्राचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी 'एसीसी अँड एस'चे मेजर जनरल एस. झा, एमआईआरसी चे ब्रिगेडियर विजय सिंह राणा हेही उपस्थित होते.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक मुक्तींचा संदेश देणाऱ्या हरियाणाच्या ऋतुची प्रेरणादायी कहाणी
भारतीय लष्करी यांत्रिकी पायदळातील एमबीटी अर्जुन, टी-90, भीष्म, टी-72 अजेय, बीएमपी या रणगाड्यांसह, मोटार वाहक ट्रॅक, शत्रूवर हल्ल्यास सज्ज असलेले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले रुद्र, चेतक हेलिकॉप्टर, सुखोई, वायू सेनेचे फिक्स विंग्ज आदींनी सहभाग होता. उपस्थितांना भारतीय लष्कराच्या अद्भूत ताकद 'याची देहा याची डोळा' अनुभवता आली.
युद्ध सराव प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय लष्करी दलात असलेल्या रणगाड्यांनी आपल्या क्षमता, अचूकता, भेडकता, निडरता याचे प्रदर्शन करत दिलेल्या लक्षांवर अचूक मारा करत आपली युद्ध सज्जता दाखवली. जमिनीवरील लक्ष असो वा आकाशातले, अचूकपणे शत्रूच्या लक्षावर मारा करून देश सुरक्षित असल्याची अनुभूती दिली. चुकूनही शत्रूदेशाचे सैन्य आपल्या भूमीकडे आगेकूच करताना दिसले तर त्याच्यावर प्रतिप्रहार करून नेस्तनाबूत करण्याचे साहस भारतीय जवानांमध्ये असल्याचे पाहायला मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरात आपले सैन्य कसे पुढारलेले आहे याची चुनूकही उपस्थितांना मिळाली.
जगातील प्रत्येक देशाच्या सीमा-सुरक्षिततेच्या दृष्टीने जमीन आणि जमिनीवरून आकाशावर निगराणी ठेवणारे दल अर्थात पायदळाची भूमिका अन्यन्यसाधरण अशीच असते. यात यांत्रिकी पायदळ हे तर युद्धजन्य परिस्थितीत किती मोलाचे काम करते हे आजवर जगात लढलेल्या अनेक लढायांमध्ये समोर आलेले आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, हवाई दलाला सध्याच्या काळात नवे महत्व प्राप्त झाले. एकीकडे 'एअर स्टाईक' हा जगाच्या दृष्टीने परवलीचा शब्द बनला असला तरी, जगातील कोणत्याही देशाने आपल्या यांत्रिकी पायदळाकडे आजही दुर्लक्ष केलेले नाही. कारण हेच यांत्रिकी पायदळ एकीकडे आपल्या देशाच्या भूमीत शिरू पाहणाऱ्या शत्रूच्या सैन्याला रोखताना उलट शत्रू राष्ट्राच्या भूमीत आगेकूच करत जगाचा भूगोल बद्दलवण्याची ताकत ठेवून असते. म्हणूनच आपल्या भारत देशाचीही यांत्रिकी पायदळाची ताकद ही प्रत्येक भारतीयांची अभिमानाने छाती फुगवणारी, आपल्या मित्र राष्ट्राला चकित करणारी आणि शत्रू राष्ट्राला धडकी भरवणारी अशीच आहे.
हेही वाचा - 'CAA बाबत टीव्हीवर ५ टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, जनता काय तो निष्कर्ष काढेल'